कोणताही कलाकार आणि त्याची कला यांचा जसा जिव्हाळ्याचा संबंध असतो त्याप्रमाणेच कलाकार आणि समाजाचा अत्यंत जवळचा संबंध असतो. मग तो कलाकार कोणताही असो गायक, चित्रकार, अभिनेता, शिल्पकार, संगीतकार, नाटककार, वादक, नर्तक कोणीही असो. या सर्व कलावंतांचे समाजाशी एक अतूट नाते असते. कोणताही कलाकार जेव्हा आपली कला सादर करत असतो वा साकारत असतो तेव्हा त्या कलाकृतीवर त्या कलावंतांचे विचार, भावना, अनुभव आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रचंड प्रभाव पडत असतो.
गायक असेल तर त्याचा आवाज, गाण्याची शैली यावर अनेक लोक प्रेम करतात. याचप्रमाणे चित्रकाराच्या चित्रातील रंग, विविध आकार, रेषा, रंगसंगती, छटा याकडे लोक तासन् तास पाहत बसतात.एखाद्या अभिनेत्याचा अभिनय पाहून लोक त्याच्याशी एकरूप होऊन जातात. खरोखरच ते पात्र म्हणजे ती व्यक्ती आहे की काय असे वाटायला लागते. शिल्पकाराने घडवलेली मूर्ती आपल्याला एवढी जिवंत वाटते की, आपण त्यात देव शोधतो. एवढेच काय तर देव मानून त्याची पूजाही करतो.
एखाद्या संगीतकाराने बनवलेली धून आपल्याला एवढी आवडते की वर्षानुवर्षे ती आपण गुणगुणतो. अगदी याचप्रमाणे कलाकृती मग ती कोणतीही असो ती जेवढी आपल्या मनाला भावेल, आवडेल तेवढी ती कलाकृती निर्माण करणाऱ्या कलावंताबद्दल आपल्या मनात आपसूकच प्रेम, आदर निर्माण व्हायला लागतो. आणि या प्रेमातूनच त्या कलावंतांचे अनेक चाहते देखील निर्माण होतात.
चाहत्यांचं आणि कलाकारांचं नातं मात्र थोडं अधिक घट्ट आणि आपुलकीचं असतं. एखाद्या कलाकाराचे चाहते कधी निर्माण होतात ? तर जेव्हा पाहता किंवा ऐकताच क्षणी एखादी कलाकृती आपल्याला आवडते आणि आपल्याला तिचा पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यायचा मोह आवरत नाही, तेव्हा आपण त्या कलाकृतीबरोबरच ती निर्माण करणाऱ्या कलावंताचे देखील चाहते होऊन जातो.
एखादा कलाकार हा विशिष्ट समाजातून वा संस्कृतीतून येत असतो. त्या समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा तो एक चेहरा असतो. कलाकार जेवढा ताकदीचा तेवढा तो संपूर्ण समाजावर आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभाव पाडत असतो. त्यामुळे तो एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित न राहता सर्व स्तरातील, सर्व लोकांना आपलासा वाटू लागतो. हल्ली सोशल मीडियामुळे तर आता कोणत्याही कलाकाराला लोकांपर्यंत पोहोचणे आणखीनच सोपे झाले आहे.
लोक विविध कलाकारांना पाहतात, त्यांच्या सोशल मीडिया पेजेसना फॉलो करतात, भरभरून प्रतिसाद देतात, प्रेम देतात आणि आपल्या आवडीच्या कलाकाराकडून काही चूक झाली तर शाब्दिक फटकारेही देतात. त्यामुळे आज काल सोशल मीडियामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांचं नातं अधिकच जवळचं झालंय. अलीकडे लोक कलेकडे फक्त मनोरंजनांचे साधन म्हणून पाहत नाहीत तर त्या कलेतून व्यक्त होणारा आशय याकडे सुद्धा बारकाईने पाहतात. एखाद्या कलाकाराने कसा पोशाख परिधान केला आहे, त्याचं वर्तन कसं आहे, कलेच्या माध्यमातून तो काय सांगू पाहतोय, व्यक्तिगत जीवनात तो कसा वागत आहे, अशा सर्व गोष्टींकडे लोक आता बारकाईने लक्ष देताना दिसतात. यातूनच कलाकाराचे समाजाशी असणारे नाते किती जवळचे झाले आहे हे आपण पाहतो.
अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक कलाकारांच्या मुलाखती फार मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. त्यामुळे त्यांचा संघर्ष, पार्श्वभूमी, शैली, व्यक्तिगत जीवन यांच्याबद्दल भरपूर माहिती थेट त्या कलाकारांच्या तोंडून ऐकायला मिळते. समाजाच्या विविध स्तरातील लोक, विशेषत: तरुण-तरुणी या कलाकारांना आदर्श मानतात, त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतात आणि तसं बनण्याचा प्रयत्नही करतात. यावरून आपल्या लक्षात येते की, एखादा कलाकार, त्याची कला आणि त्यांचे जीवन या सर्वांचा खोलवर परिणाम समाजावर होत असतो.
असे कलाकार जेव्हा सातत्याने मेहनत करून, जीव ओतून, वर्षानुवर्षे लोकांसमोर आपली कला सादर करतात, तेव्हा आपसूकच तो कलाकार त्याच्या अनेक चाहत्यांच्या मनात घर करून बसतो. समाजात एक आदराचं स्थान निर्माण करतो. संबंधित कलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जात असतो. आणि असंख्य भावी कलाकारांसाठी आदर्श कलाकृतींचा खजिना तयार करत असतो. आणि यामुळेच कलाकारांनी या सामाजिक बंधाचे भान ठेवणे खूप आवश्यक आहे. आपल्या कलेमुळे आपण किती लोकांशी जोडले गेले आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. अनेक लोक आपल्याला आदर्श मानत आहेत, अनुकरण करत आहेत, हे विसरता कामा नये.
एकूणच कलाकार आणि त्याचे समाजाशी असणारे नाते खूपच सुंदर आहे. असे कलाकार जेव्हा आपल्यातून निघून जातात, तेव्हा त्या संबंधित कलाक्षेत्रासाठी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक प्रेक्षकांसाठी तो फार मोठा आघात असतो. सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण होते. असे असले तरी त्या कलाकाराच्या हातून घडलेल्या कलाकृतींच्या स्वरूपात त्याच्या आठवणी चिरकाल अबाधित राहतात.
आज आपण ज्या प्राचीन, मध्ययुगीन काळातील जी मंदिरं, स्तूप, राजवाडे, महाल, गड, किल्ले, लेण्या, गुहेतील चित्रे पाहतो. हे सर्व अवशेष म्हणजे त्या काळातील प्रतिभावान कलावंतांच्या उत्कृष्ट कलाकृतींचा जिवंत पुरावा आहेत, हे आपल्या लक्षात येते. अनेक कवींच्या कविता, अभंग, श्लोक, कवने ही आजही लोकांना तोंडपाठ असतात. त्यांच्या संग्रही असतात. अनेक नाटके, कथा इ. इ साहित्य आजही जतन करून ठेवलेले आहे.
संगीतातील अनेक प्रकार, विविध राग, आणि त्यांची वैशिष्ट्ये शेकडो वर्षानंतर आजही अभ्यासली जातात. आपल्या अनेक पिढ्या तो अभ्यास करत आल्या आहेत. आणि तो वारसा अजूनही पुढे जात आहे.
या सर्व कला एवढी वर्षे होऊनही जिवंत राहण्यामागे या सर्व कलावंतांचा मोलाचा वाटा आहे.
एक कलाकार आपल्या कलेसाठी संपूर्ण आयुष्य वेचतो. अपार कष्टाने आपल्या कलेचा आविष्कार करतो. या सर्व कलांशिवाय आणि त्या जोपासणाऱ्या कलावंताशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही करणं कठीण वाटतं. मानवी जीवन सुखकर करण्यात कलावंतांचा फार मोठा वाटा आहे. अणि यामुळेच कलाकार आणि समाज यांचं नातं अतूट आहे.
आपण हे देखील वाचू शकता :- Power of acceptance | स्वीकार करा
व.पु.काळे यांचे प्रेरणादायी विचार


