पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि पारमिता
बौद्ध धम्मातील पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता म्हणजे बौद्ध धम्माचा पाया आहेत. मनुष्याला निर्वाण प्राप्तीकडे घेऊन जाण्यास आणि संपूर्ण जीवन शील आणि सदाचाराने जगण्यासाठी बौद्ध धम्म साहाय्य करतो. तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ उत्तर प्रदेश येथे केले. या पहिल्या प्रवचनात त्यांनी पाच परिव्राजकांना चार आर्यसत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश करून धम्मचक्र प्रवर्तित केले. दोन टोकांचा त्याग ( अती भोग आणि आत्मक्लेश ) मध्यम मार्ग, चार आर्यसत्ये आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे तथागतांच्या पहिल्या प्रवचनाचे मुख्य विषय होते.
पंचशील
पंचशील हे भगवान बुद्धांच्या पहिल्या प्रवचनात स्वतंत्ररीत्या मांडले नसले तरी गृहस्थ उपासकांसाठीची नैतिक आचारसंहिता बुद्धांनी पुढे विविध प्रसंगी मांडली."बौद्ध धम्मात नैतिक जीवनाचा पाया म्हणून पंचशीलाला महत्त्वाचे स्थान आहे. गृहस्थांनी सदाचारी आणि जबाबदार जीवन जगण्यासाठी बुद्धांनी पंचशीलाचा उपदेश केला.”
ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने काही तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी बुद्धांनी ही पाच तत्वे सांगितली आहेत. ही पाच तत्वे म्हणजेच पंचशील होय. पंचशीलाच्या साहाय्याने मनुष्याच्या चांगल्या किंवा वाईट कृतीचे मूल्यमापन करता येते.
ही पाच तत्वे पुढीलप्रमाणे आहेत :
1. मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
2. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
3. मी व्यभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
4. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
5. मी मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते.
अष्टांगिक मार्ग
भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ येथे पाच परिव्राजकांसमोर दिले. या पहिल्या उपदेशामध्ये त्यांनी दोन टोकांचा त्याग ( अति भोग आणि आत्मक्लेश ) मध्यम मार्ग, चार आर्यसत्ये आणि अष्टांगिक मार्ग याबद्दल मार्गदर्शन केले. अष्टांगिक मार्ग म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आर्यसत्याचाच एक भाग आहेत. बौद्ध वाड्मय आणि त्रिपिटकामध्ये चार आर्यसत्यांचा उल्लेख आहे. ही चार आर्यसत्ये कोणती आणि अष्टांगिक मार्ग हा त्यातील एक भाग कसा आहे ते पुढीलप्रमाणे :
चार आर्यसत्ये पुढीलप्रमाणे आहेत :
1. दुःख :
जीवनात दुःख, अडचणी, निराशा आहे हे वास्तव आहे.
2. दुःखाचे कारण :
तृष्णा, आसक्ती आणि अज्ञान यामुळे दुःख निर्माण होते.
3. दुःखाचा अंत :
तृष्णा आणि आसक्ती यांचा त्याग केल्यास दुःखाचा अंत होऊ शकतो.
4. दुःखाच्या अंताचा मार्ग :
दुःखातून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्ग सांगितला आहे.
सोप्या शब्दांत-
दुःख आहे.
दु:खाला कारण आहे.
दुःखाचा अंत शक्य आहे.
त्यासाठी एक मार्ग आहे.
चार आर्यसत्ये तर आपण पाहिली. आता चौथ्या आर्यसत्यातील दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजेच अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? अष्टांगिक मार्गांमध्ये दुःख दूर करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्याला नक्की कोणकोणते मार्ग सांगितले आहेत हे आपण समजून घेऊ.
1. सम्यक दृष्टी- जीवन आणि वास्तवाकडे योग्य दृष्टीने पाहणे अविद्येचा नाश करणे.
2. सम्यक संकल्प- ध्येय, महत्त्वाकांक्षा, विचार नेहमी चांगले आणि उदात्त असावीत.
3. सम्यक वाणी- सत्य, नम्र आणि योग्य असे बोलणे.
4. सम्यक कर्मांत- नैतिक आणि योग्य वर्तन करणे.
5. सम्यक आजीविका- दुसऱ्याची हानी किंवा अन्याय न करता उपजीविका करणे.
6. सम्यक व्यायाम- चांगल्या गुणांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे.
7. सम्यक स्मृती- आपले मन सतत सजग आणि जागृत ठेवणे.
8. सम्यक समाधी- मन एकाग्र करून वाईट विचारांना मनामध्ये थारा न देणे.
दहा पारमिता
बुद्धत्व प्राप्त करण्याच्या मार्गावर पारमितांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या केवळ धार्मिक संकल्पना नसून दैनंदिन जीवनातही प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावे अशा मानवी मूल्यांचा संग्रह आहे. बौद्ध धम्मात पारमिता म्हणजे नैतिक, भावनिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या परिपूर्णतेकडे नेणारे आदर्श गुण होय. या गुणांचा सातत्याने आणि प्रयत्नपूर्वक विकास केल्याने व्यक्तीचे चारित्र्य घडते.
दहा पारमिता ( पूर्णत्वाच्या अवस्था )
1) शील
शील म्हणजेच नीतिमत्ता. वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे. शिक्षा होण्याच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजेच शील.
2) दान
कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी, कल्याणासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान पारमिता होय.
3) उपेक्षा
फलप्राप्तीने विचलित न होणे, पण निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करत राहणे म्हणजे उपेक्षा पारमिता.
4) नैष्क्रम्य
नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.
5) वीर्य
वीर्य म्हणजे योग्य, सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजेच वीर्य पारमिता होय.
6) शांती
शांती म्हणजेच क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे असा याचा अर्थ आहे. कारण द्वेषाने द्वेष संपत नाही तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.
7) सत्य
सत्य म्हणजेच खरे. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. जे बोलतो ते सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.
8) अधिष्ठान
अधिष्ठान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
9) करुणा
करुणा म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयीची प्रेमपूर्ण भावना.
10) मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी, मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूविषयी देखील मनुष्यप्राण्यांविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्राविषयी बंधूभाव बाळगणे.
आपण हे देखील वाचू शकता :- Power of acceptance | स्वीकार करा

