Power of acceptance | स्वीकार करा

Power of acceptance 


        आपण नेहमी काही ना काही तक्रार करत असतो. आजूबाजूच्या परिस्थितीबाबत, व्यक्तींबाबत, भूतकाळातील घटनांबाबत. असं का झालं ? तसं का झालं ? माझ्यासोबत असं का घडलं ? नेहमी माझ्यासोबत असं का होतं ? ती माझ्याशी का बोलत नाही ? तो माझ्याशी का बोलत नाही ? असे भरपूर प्रश्न आपल्याला पडतात. आणि त्यामुळे आपण सतत तक्रार करतो. या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता आपण स्वतःचं प्रचंड नुकसान करून घेत असतो.


A thoughtful person reflecting on the power of acceptance and finding inner peace.
Image Credit: Designed by Magnific

या प्रश्नांची उत्तरं सापडली किंवा नाही जरी सापडली तरी आपल्याला त्रास हा होतोच. कारण प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल आपल्या हातात नसतो. तरीदेखील आपल्याला कंट्रोल हवा असतो, कारण पुढे काय होईल हे न समजल्यामुळे आपल्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. आणि ही अस्वस्थता आपल्याला झेपत नाही आणि सहनही होत नाही. 


पण या ऐवजी आपण जर गोष्टी आहेत तशा स्वीकारल्या तर आपलं अर्ध टेन्शन तिथेच संपून जातं आणि आपलं मन हलकं होतं. म्हणूनच,


     बुद्ध म्हणतात- अत्ताही अत्तनो नाथो. म्हणजेच आपण स्वतःच स्वतःचे रक्षक आहोत. बाहेरची परिस्थिती, बाहेरचं जग जरी आपल्या नियंत्रणात नसलं, तरी आपली प्रतिक्रिया ही नेहमी आपल्या हातात असते. 


Illustration of Gautama Buddha in meditation.

Acceptance म्हणजे काय ?


Acceptance म्हणजे आपल्या समोरील वास्तव आहे तसं स्वीकारणं. याचा अर्थ असा नाही की, सगळ्या गोष्टी निमुटपणे सहन करणे. 


उदाहरणार्थ, एखादं मूल परीक्षेत नापास झालं की, त्या मुलाच्या मनावर आणि पालकांच्या मनावर त्याचे गंभीर परिणाम होतात. आणि आई-वडील त्या मुलावर प्रश्नांचा भडीमार सुरू करतात. नापास कसा झाला ? अभ्यास केला नाहीस का ? मित्रांची संगत चांगली नव्हती. शिकवताना लक्ष देत नाही का ? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार मुलावर होतो. आणि या सर्वांचा त्या मुलावर प्रचंड ताण येतो.


आई-वडील हे स्वीकारायलाच तयार नसतात की आपलं मूल नापास झालंय. आणि त्यामुळे हा सगळा त्रास पालक आणि मुल दोघांनाही सहन करावा लागतो. पण या ऐवजी आपलं मूल नापास झालं हे त्या पालकांनी स्वीकारलं तर त्या मुलाच्या नापास होण्यामागची कारणं समजायला मदत होईल आणि अभ्यासात आवश्यक त्या सुधारणा करायला देखील मदत होईल.


यावरून आपल्याला असे दिसून येते की, कोणतीही गोष्ट आपण तटस्थपणे स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामागील कार्यकारण भाव शोधता येत नाही. 


कोणतीही गोष्ट स्वीकारणं खूप महत्त्वाचं असतं. वास्तव स्वीकारण्यापासून आपण जर लांब गेलो तर मग आपल्याला हे असं का झालं ? हे नाही व्हायला पाहिजे होतं ? माझ्याच बाबतीत असं का होतं ? माझं नशीब वाईट आहे. असे तणावपूर्ण विचार आपल्या मनात येऊ लागतात आणि मग आपण हताश होतो.


थोडक्यात, स्वीकार करणं म्हणजे कमकुवतपणा नाही. तर स्वीकार करणं म्हणजे तुम्ही परिस्थितीला विरोध करणं थांबवता. 'माझ्यासोबतच का ?' हा प्रश्न सोडून देता आणि 'हे आहे, आता पुढे काय?'असा विचार करायला सुरुवात करतात. 



स्वीकार करणं कठीण का वाटतं ?


अहंकार (Ego)

समोरची परिस्थिती पाहून आपल्याला वाटतं माझ्यासोबत हे होऊ शकत नाही, या भ्रमात आपण असतो. जेव्हा प्रत्यक्ष वास्तव समोर येतं तेव्हा ते स्वीकारायला आपल्याला जमत नाही.


अपेक्षा (Expectation) 

आपण स्वतः कडून आणि इतरांकडून भरपूर अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला दुःख होतं. 


Control ची सवय 

आपल्याला सगळं आपल्या मनाप्रमाणे हवं असतं. मनाविरुद्ध झालं किंवा मनाविरुद्ध कोणी वागलं की आपल्याला त्रास होतो. म्हणजेच प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनासारखी हवी असते. असं अप्रत्यक्षपणे का होईना आपल्याला वाटत असतंच.

 

Illustration of a stressed young woman struggling with emotional stress.


स्वीकार न केल्याचे काय परिणाम होतात ?

जेव्हा आपण वास्तव स्वीकारल्यापासून लांब जातो तेव्हा :

 

1. आपण एकाच गोष्टीचा सतत विचार करत राहतो.

2. मनावरचा ताण वाढतो. 

3. भावनिकरीत्या थकवा येतो. 

4. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. 

5. आपण वर्तमान काळात जगायचं विसरून जातो. 



1. आपण एकाच गोष्टीचा सतत विचार करत राहतो 


एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वीकारत नाही तेव्हा ती सतत आपल्या मनात घोळत राहते. कोणत्याही कामात आपलं लक्ष लागत नाही. आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. हे का झालं ? कसं झालं ? माझ्यासोबतच का झालं ? मी असं बोलू का ? असं बोलल्याचे काय परिणाम होतील ? मी काय करू ? कसं वागू ? पुढे काय होईल ? कसं होईल ? असे भरपूर प्रश्न आणि विचार मनात येत राहतात. 


2. मनावरचा ताण वाढतो 


एखादी गोष्ट न स्वीकारल्याने आपलं मन त्या गोष्टीशी भांडत राहतं. लढत राहतं. प्रतिकार करत राहतं आणि यामुळे आपल्या मनावरचा अतिरिक्त ताण वाढतो. आपण वास्तव स्वीकारायला तयार नसल्यामुळे नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते. आणि मनावरचा ताण आपोआपच वाढतो. 


3. भावनिकरित्या थकवा येतो


जेव्हा आपण एखादी परिस्थिती, व्यक्ती किंवा घडलेली घटना स्वीकारत नाही, तेव्हा आपल्या मनात संघर्ष चालू होतो. आणि या संघर्षात आपली भावनिक ऊर्जा भरपूर प्रमाणात खर्च होते.

उदाहरणार्थ, 

एखादा व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागला नाही तर आपण त्या गोष्टीचा वारंवार विचार करतो. त्याने असं का केलं ? त्याने असं नाही करायला पाहिजे होतं ? हे बदललं पाहिजे. म्हणजे जे समोर आहे ते आपल्याला नको असतं. आपल्याला वेगळं काहीतरी अपेक्षित असतं. आणि यातूनच overthinking वाढतं. मन अस्वस्थ होतं. आणि हळूहळू आपण भावनिकदृष्ट्या थकायला लागतो. कारण जे आपल्याला नियंत्रणात नाही ते आपण बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपली अतिरिक्त ऊर्जा खर्च होते आणि मनावरचा ताण वाढतो. 



4. नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो 


जर आपण एखाद्या व्यक्तीला आहे तसंच स्वीकारलं नाही तर आपण त्याला सतत बदलण्याचा प्रयत्न करू. अपेक्षाभंग झाल्यावर राग, नाराजी, गैरसमज निर्माण होऊ लागतील., आणि समोरच्या व्यक्तीवर भावनिक दबाव येऊ लागेल.


त्या व्यक्तीला स्वतःच्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्य मिळणार नाही. आणि हळूहळू मग नात्यात दुरावा निर्माण होईल. संवाद कमी होऊन नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ लागेल. 


        म्हणजेच एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांसकट न स्वीकारणं आणि आपल्याला हवं तसंच त्याने वागलं पाहिजे अशी अपेक्षा करणं यांमुळे नात्यांमध्ये तणाव वाढायला सुरुवात होते. 


5. आपण वर्तमान काळात जगायचं विसरून जातो


जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारत नाही, तेव्हा आपण सतत भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करत राहतो. असं का झालं ? पुढे काय होईल ? या विचारांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे वर्तमान क्षणांतील आनंद, संधी, सुंदर सुंदर अनुभव घेण्याऐवजी आपण सतत काळजी आणि विचारांच्या जाळ्यात अडकतो.


खरंतर भूतकाळात घडून गेलेल्या घटना आपण बदलू शकत नाही, हे माहीत असून सुद्धा आपण त्या गोष्टींचा सातत्याने विचार करत राहतो. आणि सतत काय होईल ? कसं होईल ? पुढे काय होईल ? या विचारांनी आपण भविष्यकाळ बदलण्याचा प्रयत्न करत राहतो.


म्हणजेच एखादी गोष्ट न स्वीकारल्यामुळे आपण वर्तमान काळात जगणंच विसरून जातो.

      

 

Illustration of a happy group of friends smiling together.


एखादी गोष्ट स्वीकारल्यामुळे कोणते फायदे होऊ शकतात : 


1) कोणतीही गोष्ट स्वीकारल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहू लागतो.

2) फक्त भावनेच्या भरात वाहून न जाता आपण वास्तववादी विचार करू लागतो.

3) आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि विचार करण्यात अधिक स्पष्टता येते. 

4) एकदा का आपण गोष्ट स्वीकारली आणि वास्तववादी विचार करू लागलो की आपोआपच आपलं मन शांत होतं. आणि मन शांत झाल्याने स्वाभाविकपणे आपण आपल्या भावनांवरही नियंत्रण मिळवू लागतो. 

5) स्वीकार केल्यामुळे आपण भावनेच्या भरात प्रतिक्रिया कमी देतो.

6) इतरांच्या वागण्याने आपण स्वतःला त्रास करून घेत नाही.

7) आपण भावनिक दृष्ट्या स्वतंत्र होतो. स्वावलंबी होतो.

8) आंतरिक शांती आणि समाधान मिळते.

9) आपण परिस्थितीचे वा एखाद्या व्यक्तीचे गुलाम राहत नाही.



स्वीकार करणं हे एक कौशल्य आहे. ते मिळवण्यासाठी आपल्याला सातत्याने या कौशल्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनात करावा लागेल आणि त्याचा अनुभवही घ्यावा लागेल. 


ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांच्याशी लढणं थांबवलं पाहिजे. तरच आपण स्वतःला तणावमुक्त, स्वतंत्र, स्वावलंबी आणि शांत ठेवू शकतो.

स्वीकार करणे म्हणजे हार नाही तर स्वतःच्या मनावर विजय मिळवणं आहे. 


आपण हे देखील वाचू शकता  :-

5 things about Dr. B. R. Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.