वाचाल तर वाचाल हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकतो. या उक्तीप्रमाणे बरेच जण काही ना काही वाचत असतात. वर्तमानपत्रे, मासिके, कथा, कादंबरी, कविता या विविध प्रकारच्या वाचनातूनच माणूस प्रगल्भ बनत जातो. लेखक आपल्या भावना, कल्पना, अनुभव, मनातील अव्यक्त भाव प्रकट करण्यासाठी ज्या माध्यमांचा आणि ठराविक रचनेचा वापर करत असतो त्या विविध माध्यमांना आणि रचनांना एकत्रितपणे साहित्य असे म्हणतात.
साहित्याचे आणि मानवी जीवनाचे अतूट नाते आहे. त्यातही कथा, कादंबरी, कविता हे साहित्यप्रेमींंसाठी विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. आज आपण या लेखात साहित्याच्या विविध प्रकारांबद्दल माहिती घेणार आहोत. साहित्याचे अनेक प्रकार जगाच्या कानाकोपऱ्यात वाचले जातात. काही पूर्वपार चालत आलेले आणि काही नव्याने उदयास आलेले. या सर्व प्रकारांची प्राथमिक माहिती आपण या लेखात जाणून घेत आहोत.
1. गद्य
कादंबरी :-
कादंबरी हा एक गद्य साहित्यप्रकार असून यामध्ये काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित कथेचा समावेश होतो. कादंबरी ही दीर्घकथा असून यात अनेक पात्रे, प्रसंग, भावभावनांचा अविष्कार याची मनोरंजक पद्धतीने मांडणी केलेली असते .
लघुकथा :-लघु म्हणजेच लहान आणि कथा म्हणजेच गोष्ट. या नावातच गद्य साहित्याचा अर्थ दडलेला आहे. लघुकतेमध्ये एकाच घटनेवर, पात्रावर किंवा विशिष्ट अनुभवावर लक्ष केंद्रित केले जाते. अतिशय कमी अवकाशामध्ये परिणामकारक आशय देण्याचा प्रयत्न केला जातो.
निबंध :-
ज्येष्ठ समीक्षक मो.रा.वाळंबे यांच्या मते, निबंध या शब्दाचा अर्थ आहे, बांधणे. गुंफणे. जुळविणे. निबंधामध्ये एखाद्या विषयाबाबतचे आपले विचार बांधले जातात. गुंफले जातात. निबंधात एखाद्या विषयाबाबत साधकबाधक लेखन केलेले असते. प्रभावी सुरुवात, अर्थपूर्ण आशय, वेगवेगळे परिच्छेद आणि सुयोग्य शेवट अशी निबंधाची रचना केलेली असते.
आत्मचरित्र
आत्मचरित्र म्हणजेच लेखकाने स्वतः स्वतःचे लिहिलेले चरित्र. आत्मचरित्रामध्ये लेखक स्वतःचे व्यक्तिगत अनुभव, जीवनातील महत्त्वाचेअसे टप्पे, महत्त्वाच्या व्यक्ती, घटना या सर्वांचा समावेश असतो. आत्मचरित्रामध्ये लेखकाच्या अनुभवाचे आणि व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब उमटलेले असते.
जीवन चरित्र
जीवन चरित्र हे आत्मचरित्र सारखेच असते. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे, जीवनाचे वर्णन करणारे पुस्तक म्हणजेच जीवन चरित्र. आत्मचरित्र लेखक स्वतः लिहितो, तर जीवन चरित्र हे दुसऱ्या व्यक्तीकडून लिहिले जाते.
प्रवासवर्णन
प्रवासवर्णन हा एक गद्य साहित्य प्रकार असून यामध्ये प्रवासाचे वर्णन केले जाते. प्रवासातील अनुभव, लोक, पाहिलेले ठिकाण, तेथील संस्कृती, परिसर, घटना या सर्वांचे वर्णन जात केले जाते. प्रवासवर्णन मौखिक स्वरूपाचे देखील असू शकते.
डायरी
डायरीमध्ये व्यक्ती त्याचे दैनंदिन अनुभव, मनात येणाऱ्या भावना, विचार आणि घडून गेलेल्या घटना या सर्वांची स्वतःसाठी नोंद करत असतो. डायरी ही त्या संबंधित व्यक्तीच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब असून ती आत्मकथनात्मक स्वरूपाची असते.
ललित लेख
ललित लेख हा या साहित्यप्रकारामध्ये लेखक आपले अनुभव, विचार, भावना अतिशय कलात्मक पद्धतीने सादर करतो. आणि संबंधित भाषेचे सौंदर्य त्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो.. यासाठी उपमा, रूपक यासारख्या भाषा सौंदर्य वाढवणाऱ्या संकल्पनांचा वापर केला जातो. ललित लेखनावर लेखकाच्या भावनांचा, अनुभवांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव असतो. या साहित्यप्रकारामध्ये लेखकाला विषय निवडीचे स्वातंत्र्यदेखील असते.
2. पद्य
गीतकाव्य
आपल्या मनातील संवेदना, प्रेम, विरह, दुःख, आनंद, वेदना अशा अनेक भावना एखाद्या काव्यामार्फत सुरेल पद्धतीने व्यक्त केले जातात. तेव्हा त्यास गीतकाव्य म्हणतात.
महाकाव्य
महाकाव्य म्हणजे एक प्रदीर्घ, भव्य अशी काव्यात्मक रचना होय. यात एखाद्या समाजास महत्वपूर्ण असलेल्या महान व्यक्ती, ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचा भव्य आविष्कार आढळतो.
मुक्तछंद
मुक्तछंद या पद्य साहित्यप्रकारामध्ये कवीला वृत्त, मात्रा किंवा यमक, इत्यादींचे बंधन न पाळता आपल्या भावना आणि कल्पना स्वच्छंदपणे मांडण्याची मुभा असते. कवितेची पारंपारिक चौकट तोडून, वैचारिक आणि भावनिक स्वातंत्र्य घेऊन मुक्तछंद कवितेची रचना केली जाते. त्यात एक विशिष्ट लयबद्धता असते.
गझल
गझल हा काव्य आणि गायन प्रकार असून यात प्रेम, विरह, वेदना, जीवनातील विविध भावनांचे वर्णन लयबद्ध रीतीने केलेले असते. अनेक शेरांची मिळून एक गझल बनते. प्रत्येक शेर एक स्वतंत्र कविता असते.
हायकू
हायकू हा एक जपानी काव्यप्रकार असून यामध्ये काव्याची रचना ५- ७- ५ अशी क्रमाने केलेली असते.म्हणजेच पहिल्या ओळीत ५, दुसऱ्या ओळीत ७ आणि तिसऱ्या ओळीत ५ अशी हायकू कवितांची रचना असते. निसर्ग, ऋतु, वातावरण आणि क्षणानुभूती हे हायकू कवितांचे मुख्य विषय असतात.
सुनीत ( सॉनेट )
हा एक पाश्चात्य काव्यप्रकार आहे. इंग्रजीत त्याला सॉनेट असे संबोधले जाते. तर मराठीत या काव्यप्रकाराला सुनीत असे म्हणतात. यामध्ये काव्याची रचना 14 ओळींमध्ये केली जाते. तसेच प्रेम आणि मानवी भावविश्व हे सॉनेटचे प्रमुख विषय असतात.
एलिजी
एलिजी म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ त्याच्याबद्दलचा शोक व्यक्त करण्यासाठी लिहिलेली एक गंभीर आणि भावनिक कविता. ज्यामध्ये दुःख, वेदना आणि संबंधित व्यक्तींच्या आठवणींचा समावेश असतो.
3. नाट्य
शोकांतिका
ज्या नाटकाचा किंवा कथानकाचा शेवट दुःखद आणि वेदनादायक असतो त्याला शोकांतिका म्हणतात. यामध्ये मानवी जीवनातील अटळ सत्य, दुःख, संघर्ष, इत्यादी गंभीर भावभावनांचे चित्रण केलेले असते.
सुखांतिका
या नाटकामध्ये हास्यविनोद, गमतीशीर घटना यांचा भरपूर वापर केलेला असतो. कथानकाचा शेवट नेहमी आनंदी होतो. समस्येचे निराकरण केले जाते. त्या नाटकास सुखांतिका असे म्हणतात.
प्रहसन
प्रहसन हा एक नाट्य साहित्याचा प्रकार असून, विनोदी पात्रे, प्रसंग यांच्या सहाय्याने वाचकांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. मनोरंजन हा मुख्य हेतू असला तरीही प्रहसणाच्या माध्यमातून हास्य विनोदासह समाजातील गंभीर विषयांवर मार्मिक भाष्य केले जाते.
एकांकिका
नाटकाच्या या प्रकारामध्ये संपूर्ण नाटक एकाच अंकात सादर केले जाते. अर्धा ते पाऊण तासाच्या कालावधीमध्ये एकांकिका सादर केली जाते. गंभीर, विनोदी, सामाजिक अशा कोणत्याही विषयावर एकांकिका आधारलेली असू शकते.
सामाजिक नाटक
कौटुंबिक समस्या, नातेसंबंध, सामाजिक रूढी, परंपरा आणि मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंतीच्या समस्या, अंधश्रद्धा, स्त्री- पुरुष समानता, मानवी मूल्य अशा अनेक विषयांवर ज्या नाटकांमध्ये भाष्य केले जाते त्यास सामाजिक नाटक असे म्हणतात.
ऐतिहासिक नाटक
ऐतिहासिक नाटकांमध्ये इतिहासातील घटना, महत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय प्रसंग यावर कथानक आधारित असते. भूतकाळातील सत्य, महत्त्वाच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, घटना या सर्वांचा जिवंत अनुभव देण्यावर भर असतो.
4. लोकसाहित्य
लोककथा
मौखिक परंपरेने चालत आलेल्या आणि विकसित झालेल्या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेल्या कथा म्हणजेच लोककथा. मागील पिढीचे अनुभव, विश्वास, सामाजिक मूल्ये या सर्वांचा समावेश लोककथांमध्ये होतो.
लोकगीत
मौखिक परंपरेने चालत आलेली, संगीताच्या शास्त्रीय चौकटीत न बसणारी, तरी देखील सहज सोपी आणि सामान्य माणसाच्या अनुभवविश्वाशी जोडलेली गाणी म्हणजेच लोकगीते. मानवी जीवनातील अनेक प्रसंग, सणउत्सव, महत्त्वाचे दैनंदिन जीवनातील प्रसंग यावर ही लोकगीते रचली जातात.
लोकनाट्य
लोकसंगीत, लोकनृत्य, लोकाभिनय या सर्वांचे मिश्रण असलेले नाट्य म्हणजेच लोकनाट्य. या नाटकांच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवले जातात. पारंपरिक वेशभूषा, पारंपारिक संगीत,पारंपरिक नृत्य यांचा लोकनाट्यांमध्ये वापर केला जातो आणि अनेक स्थानिक परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
म्हणी व वाक्प्रचार
जीवनातील छोट्या छोट्या अनुभवावर आधारित धडा किंवा तत्वज्ञान रूपकात्मक अर्थाने एका वाक्यात सांगितला जातो त्यास म्हणी असे म्हणतात. दैनंदिन जीवनातील विशिष्ट प्रसंगात वापरले जाणारे ठराविक शब्दसमूह ज्याचा अर्थ रूपकात्मक किंवा भावार्थाने घेतला जातो.
5. धार्मिक आणि अध्यात्मिक साहित्य
यामध्ये सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा समावेश होतो. तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यासारख्या महाकाव्यांचादेखील समावेश होतो.
6. संत साहित्य
महाराष्ट्रात तसेच भारतात अनेक थोर संत होऊन गेलेत. त्यांचे तत्त्वज्ञान आजही लोकप्रिय आहे. यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास आणि या सर्व संतांचे अभंग, ओव्या, प्रवचने, तत्वज्ञान आणि त्यांनी केलेले समाजप्रबोधन या सर्वांचा एकत्रितपणे संत साहित्यामध्ये समावेश होतो.
7. समीक्षात्मक साहित्य
एखाद्या साहित्यकृतीचा आशय, प्रकार, शैली, रचना, उद्देश, प्रभाव, मर्यादा या सर्वांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून केलेले विश्लेषण म्हणजेच समीक्षात्मक साहित्य. समीक्षात्मक साहित्यामध्ये संबंधित साहित्याचे गुण आणि दोष याचे वस्तुनिष्ठ परीक्षण केले जाते. यामध्ये साहित्य समीक्षा, पुस्तक परीक्षण, विश्लेषणात्मक निबंध, संशोधनपर लेख, चिकित्सक परीक्षण यांचा समावेश होतो.

8. स्त्रीवादी साहित्य
स्त्रियांचे अनुभव, भावविश्व, संघर्ष, त्यांचे समाजातील स्थान, ओळख, स्त्री-पुरुष समानता यासारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. स्त्रीवादी साहित्यामध्ये स्त्रियांची आत्मचरित्रे, चरित्रे, सामाजिक कादंबरी, स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित कादंबऱ्या, कथा, कविता, कामगार स्त्रिया, ग्रामीण स्त्रिया, दलित आदिवासी स्त्रिया यांची आत्मकथने, त्यांच्या जीवनावर आधारित साहित्य, स्त्रीवादी लेख, इत्यादींचा स्त्रीवादी साहित्यामध्ये समावेश होतो.
9. दलित साहित्य
समाजातील शोषित, वंचित, अस्पृश्यता, अन्याय, भेदभाव आणि संघर्ष अनुभवलेल्या दलित समाजातील लोकांच्या जीवनाचे समग्र वर्णन करणारे साहित्य म्हणजे दलित साहित्य होय. दलित साहित्यामध्ये प्रामुख्याने दलितांच्या आयुष्यावरील कथा, कविता, दलितसमुहातील व्यक्तींची आत्मचरित्रे, सामाजिक कादंबऱ्या, सामाजिक विषमता, जातीभेद यांवर टीका करणारे लेखन, इत्यादींचा समावेश होतो.
10. बालसाहित्य
लहान मुलांचे भावविश्व, कल्पनाशक्ती, समज, वय या गोष्टी विचारात घेऊन लिहिलेल्या कविता, गोष्टी, चित्रकथा, मनोरंजक साहित्य या सर्वांना एकत्रितपणे बालसाहित्य असे म्हणतात. त्यामध्ये प्रामुख्याने परिकथा, चित्रकथा, बडबड गीते, गोष्टी, बोधकथा, बालनाट्य, बालकविता, इत्यादी साहित्याचा समावेश होतो.
11. ई साहित्य
ई -साहित्य म्हणजे मोबाईल, इंटरनेट, टॅब, संगणक, लॅपटॉप, ऑडिओ बुक, पीडीएफ, वेबसाईट यासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले आणि वाचले जाणारे साहित्य म्हणजे ई- साहित्य. ई- साहित्यामध्ये ब्लॉग, कविता, ई- पुस्तके, सोशल मीडियावरील लेखन, ऑडिओ बुक्स, मासिके, डिजिटल जनरल अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.
( टीप: प्रस्तुत लेखात दिलेले साहित्यप्रकार हे प्रमुख आणि सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. काळानुसार, प्रदेशानुसार, माध्यमानुसार साहित्याचे आणखीही अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. त्यामुळे साहित्याचे हे प्रकार अंतिम नसून अभ्यासाच्या सोयीसाठी केलेले एक सर्वसाधारण वर्गीकरण आहे. )
व.पु.काळे यांचे प्रेरणादायी विचार
Image Credits- Freepik


