मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याचे हे 5 उपाय | 5 Tips to reduce Mobile Addiction

        

        मोबाईल हातात घेतला की युट्युब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाॅट्सॲप हे सर्व ॲप जणू काही आपली वाटच बघत असतात असे लगेच डोकावून पाहतात आणि आपणही लगेचच त्यापैकी दिसेल त्या ॲपवर क्लिक करून व्हिडिओ, शॉर्ट्स, रील्स, स्टेटस एकामागून एक पाहायला लागतो. आपण कोणत्या कामासाठी मोबाईल हातात घेतला होता याचा सुद्धा विसर आपल्याला पडतो. पाच मिनिटे, दहा मिनिटे, वीस मिनिटे, अर्धा तास आणि पाहता पाहता कधी एक तास संपतो हे कळत सुद्धा नाही. जेवताना, चालताना, झोपण्यापूर्वी, बसल्या बसल्या कितीतरी वेळा आपण सर्रास मोबाईलमध्ये पाहत असतो. सकाळी उठल्या उठल्या मोबाईलचे नोटिफिकेशन पाहणे हे तर कित्येक जणांच्या सवयीचं झालंय. आपल्याला या मोबाईलची इतकी सवय झाली आहे की तो पाहिल्याशिवाय आपला दिवस पूर्णच होत नाही. मोबाईल न बघितल्याने काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि अपुरेपणाची भावना मनात निर्माण होते.


Mobile addiction



मोबाईलचं व्यसन कसं लागतं ?


मोबाईलचं व्यसन लागण्यामागे एक साधं सोपं कारण आहे. आपण जेव्हा आपल्याला आवडणारं काम करतो तेव्हा आपल्याला त्यातून आनंद मिळतो. आणि हाच आनंद आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. हा आनंद आपल्याला वेगवेगळ्या कामातून मिळतो.


उदाहरणार्थ, वाचन, फिरणे, बागकाम करणे, गायन, वादन, नृत्य करणे, बोलणे यांसारख्या असंख्य कामातून आपल्याला आनंद मिळत असतो. आता याच्यात अजून एका आनंद देणाऱ्या कामाची भर पडली आहे ते म्हणजे मोबाईल पाहणं. आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन स्त्रवल्यामुळे हा आनंद आपल्याला मिळत असतो.


जेव्हा हे डोपामीन आपल्या मेंदूमध्ये स्त्रवतं तेव्हा त्या क्षणापुरतं आपल्याला बरं वाटतं, आणि जे काम केल्यामुळे आपल्याला बरं वाटतं ते काम आपण पुन्हा पुन्हा करतो. मोबाईलच्या बाबतीतही तेच होतं. आपण मोबाईलवर स्क्रोलिंग करताना, गेम खेळताना कित्येकदा हे डोपामीन नावाचं रसायन आपल्या मेंदूत स्त्रवतं आणि त्यामुळे मोबाईल पाहताना आपल्याला बरं वाटतं आणि आपण पुन्हा पुन्हा मोबाईलवर स्क्रोलिंग करतच राहतो. 



मोबाईलचं व्यसन कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय 





1. विविध ॲप्सचे अनावश्यक नोटिफिकेशन बंद करणे 


आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या ॲप्सचे नोटिफिकेशन सतत येत असतात. त्यातील बहुतेक नोटिफिकेशन आपल्या काहीही कामाचे नसतात. म्हणूनच आपल्याला आवश्यक असणारे नोटिफिकेशन चालू ठेवून बाकी सर्व नोटिफिकेशन बंद केल्याने आपलं लक्ष विनाकारण मोबाईलकडे जाणार नाही. 



2. जास्त वेळ मेसेजवर चॅटिंग करणे, फोनवर बोलणे टाळावे 


आजकालच्या तरुण मुला-मुलींमध्ये मेसेजवर चॅटिंग करणे ही खूपच सर्वसामान्य बाब झाली आहे. आता तर शाळेत जाणाऱ्या मुला मुलींचेही विविध सोशल मीडिया ग्रुप्स असतात आणि तिथे ही मुले चॅटिंग करत असतात. त्याशिवाय काहीजणांना तासन् तास फोनवर बोलण्याची सवय असते. हे फोनवर बोलने आणि चॅटिंग करणे एवढे सवयीचे बनते की त्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही. मोबाईलचे व्यसन लागण्यामागे या दोन्ही सवय कारणीभूत ठरतात. म्हणून आपण स्वतः जाणीवपूर्वक ठरवून जास्तीत जास्त प्रत्यक्ष बोलण्यावर भर द्यावा. मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. 



3. कोणतेही काम करताना मध्येच मोबाईलवर स्क्रोलिंग करू नये 


लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जेवताना विरंगुळा म्हणून काहीतरी पाहण्याची सवय लागून गेलेली असते. काहीजण तर जेवताना मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करत जेवतात. याचा विपरीत परिणाम आपल्या पचनक्रियेवर आणि एकूणच शरीरावर होतो. काहीजण तर चालताना सुद्धा मोबाईलवर स्क्रोल करतात. इतरांशी बोलताना सुद्धा मध्येच मोबाईलकडे बर्याच जणांचा हात जातो. ही सर्व लक्षणे मोबाईलचे व्यसन लागण्याची आहेत. 


   

4. रिकाम्या वेळेत मोबाईल सोडून अन्य आवडीची कामे करावीत 


सर्वांनाच काही ना काही छंद जोपासायला आवडतात. परंतु, सर्वांनाच वेळेअभावी शक्य होत नाही. काहीजण तर पूर्वी खूप छोट्या छोट्या गोष्टी करून आनंद मिळवत असत. पण आता या सर्व कामांचा वेळ मोबाईलने घेतल्यामुळे इतर कामांकडे मात्र दुर्लक्ष होतं.


जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो तेव्हा आपली कित्येक दिवसांपासून राहिलेली कामं जे आपण फक्त ठरवतो, करत मात्र नाही. ती करावीत. उदाहरणार्थ, एखादे पुस्तक वाचने, फिरायला जाणे, बागकाम करणे, घरातील साफसफाई करणे, आवडीचे पदार्थ बनवून पाहणे, नातेवाईकांशी गप्पा मारणे, छंद जोपासणे, इत्यादी. 



5. दिवसभराच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे 


सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बरीच लहान मोठी कामे करत असतो. त्यातील काही कामे ही ठरलेली असतात. तर काही कामे अचानक उद्भवलेली असतात. आपले नेहमीची ठरलेली कामे ही आपण वेळेत आणि प्राधान्यक्रम ठरवून केली तर आपल्याजवळ किती वेळ उरतो याचा अचूक अंदाज येईल. आणि या उरलेल्या वेळेत फक्त मोबाईल न पाहता इतर आवडीची आणि उपयुक्त कामे करता येतील.



mobile addiction


अशा प्रकारे, आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे जाणीवपूर्क लक्ष देऊन मोबाईलचा वापर कमी करू शकतो. आणि आपला वेळ सत्कारणी लावू शकतो. यामुळे आपण मोबाईलच्या व्यसनापासून तर दूर राहूच शिवाय आपल्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवू शकतो. 


सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल पासून दूर राहणे कठीणच. मोबाईल तर आपल्या दैनंदिन जीवनातील एक गरज होऊन बसलेला आहे. आपली अनेक कामे मोबाईलवर अवलंबून असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत या सर्व डिजिटल साधनांपासून दूर राहणे अशक्यच आहे. पण तरीही या सर्व साधनांच्या आहारी न जाता आपण आपलं माणूसपण जपणं खूप महत्त्वाचं आहे.


Image Credits- Freepik


लोकप्रिय पोस्ट -

AI म्हणजे काय? AI in Marathi


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.